बीड : बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं याबद्दल सविस्तर माहिती दिली. दरम्यान, आज या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला कोर्टाने मोठा दणका दिलेला असल्याचं देखील आता समोर आलं आहे.
वाल्मिक कराड याने या प्रकरणी आपण निर्दोष असून दोषमुक्तीचा अर्ज दाखल केलेला होता. या अर्जावर आज कोर्टात सुनावणी झाली. वाल्मिक कराडचा हा अर्ज आता कोर्टाने फेटाळला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कोर्टाने कराडच्या दोषमुक्तीच्या याचिकेला फेटाळून लावल्याने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे या गुन्ह्यातून सुटका करून घेण्याच्या कराडच्या प्रयत्नांना खीळ बसली असून, त्याची कायदेशीर अडचण आणखी वाढली आहे.


