वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गसंपत्तीने समृद्ध आहे. आजवर येथे सुमारे ११५० ते १२०० हून अधिक वनस्पतींची नोंद झाली आहे. परंतु याच जिल्ह्यातून आणखी तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध नुकताच लावण्यात आला आहे. हे संशोधन केवळ सिंधुदुर्गच्या नव्हे, तर महाराष्ट्राच्या वनसंपदेसाठीही मोठे योगदान ठरणार आहे. वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय आश्रुबा पैठणे आणि त्यांच्या विद्यार्थी २०१५ पासून सिंधुदुर्गच्या वनसंपत्तीचा सखोल अभ्यास करीत आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या गावातील झाडांबद्दल अधिक जाणून घ्या, त्यांचे फोटो काढा, शास्त्रीय नावे शोधा, उपयोग समजा, अशी प्रेरणा देत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आत्मियता आणि संशोधनाची रुची वाढते. या उपक्रमातूनच ही दुर्मीळ वनस्पती शोध मोहीम सुरू झाली.

संशोधनातील ‘ह्या’ आहेत दुर्मीळ वनस्पती –
१) Kaemferia rotunda L. (भुईचाफा) –
भारतामध्ये या प्रजातीच्या ८ प्रकार आढळतात. महाराष्ट्रात या वनस्पतीचा आधी फक्त पुणे परिसरात उल्लेख होता. परंतु F.Y.B.Sc. (Botany) ची विद्यार्थिनी कु. सारिका विलास बाणे हिला कणकवली तालुक्यातील शिवडाव गावात ही दुर्मीळ वनस्पती आढळली.

२५ वर्षांनंतर कोकणात या वनस्पतीचा पुन्हा शोध लागला आहे. या संशोधनाचा गौरव “Applied Research in Life Sciences” (जून २०२५, अहमदाबाद) या आंतरराष्ट्रीय पुस्तकात करण्यात आला आहे.
३) Staurogyne glutinosa (Wall. ex C.B.Clarke) Kuntze (चिकट मत्स्याक्षी) –
तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु. योगेश्री केळकर हिने सोनाळी गावात ही वनस्पती शोधली.

ओळख पटवण्यासाठी प्रा. पैठणे यांची मदत घेतली असता लक्षात आले की महाराष्ट्रात याआधी हिची नोंद नव्हती. भारतात या प्रजातीच्या १४ प्रकारांपैकी दोन फक्त महाराष्ट्रात होत्या. ही वनस्पती पूर्वी बिहार, केरळ, ओरिसा, उत्तर प्रदेश या राज्यांत होती. आता महाराष्ट्रातही हिची भर पडली आहे. हे संशोधन “Journal of Economic Taxonomic Botany” (सप्टेंबर २०२४, राजस्थान) या नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
३) Hyptis capitata Harley (‘गाठी तुळस’ किंवा ‘रान तुळस’) –
कुडाळ तालुक्यातील हुमरमाळा गावातील डोनर या भागात प्रा. पैठणे यांच्या वनस्पती सर्वेक्षणात ही वनस्पती आढळली. पूर्वी या वनस्पतीची नोंद फक्त आंदमान-निकोबार, केरळ, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि गोवा (मोलेम नॅशनल पार्क) येथे होती. महाराष्ट्राच्या वनसंपदेत या प्रजातीची ही पहिली नोंद ठरली आहे. हे संशोधन “International Journal of Advance Research” (एप्रिल २०२४, इंदोर, मध्यप्रदेश) मध्ये प्रकाशित झाले आहे.
या तीन्ही वनस्पतींचे शुष्क नमुने आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या ‘हर्बेरियम’ मध्ये ठेवलेले आहेत. यामुळे भविष्यातील अभ्यासकांना या दुर्मीळ वनस्पती थेट पाहता येतील. या यशस्वी संशोधनाची दखल महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, भाजपाचे महामंत्री आदरणीय विनोदजी तावडे यांनी घेतली आहे. त्यांनी कु. सारिका बाणे आणि डॉ. विजय पैठणे यांचे कौतुकपर पत्र पाठवले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.अर्जुन रावराणे, विश्वस्त गणपत दाजी रावराणे, शरद रावराणे, स्थानिक समितीचे सचिन प्रमोदजी रावराणे यांनी विद्यार्थिनी व प्राध्यापक यांचा महाविद्यालयात सत्कार व अभिनंदन केले.शोध हा थांबत नाही, तो पुढील पिढ्यांना दिशा देतो.सिंधुदुर्गसारख्या निसर्गसंपन्न जिल्ह्यात विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून वनसंपत्तीचा केलेला हा अभ्यास संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
संपर्कासाठी:
जिल्ह्यातील निसर्गप्रेमी, अभ्यासक किंवा वनस्पतीविषयी अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांनी प्रा. विजय पैठणे (८०१०३२६४२२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


