मुंबई : मुंबईतील एका नामवंत शाळेत काही दिवसांपूर्वी धक्कादायक घटना घडली होती. एक 40 वर्षीय शिक्षिका 16 वर्षाच्या मुलावर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करत होती. मुंबईतील वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन त्याच्यावर हे अत्याचार झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी आरोपी शिक्षिकेने आता नवा दावा केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी शिक्षिकेने जामीनासाठी अर्ज केला होता. यावेळी आरोपी महिलेने म्हटले की, मी विद्यार्थ्यासोबत कधीही जबरदस्ती केली नव्हती. उलट तोच या संबंधात राहण्यासाठी हट्टाला पेटला होता. मी त्याला बऱ्याचदा समजावण्याचा प्रयत्नही केला होता असं विधान या शिक्षिकेने जामीन मागताना कोर्टापुढे केले आहे. शिक्षिकेनं सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो कोर्टानं शिक्षिकेला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
जामीन अर्जात नमूद केल्याप्रमाणे आरोपी शिक्षिकेचे विद्यार्थ्यांसोबत असलेले संबंध एकतर्फी नव्हते हे सिद्ध होतंय, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. तसेच 40 वर्षीय आरोपी महिला ही 11 वर्षांच्या जुळ्या मुलांची आई आहे. तिच्या मुलांची घरी काळजी घेण्यासाठी सध्या कुणीही नाही. त्यांच्या शिक्षणाचं देखील नुकसान होतं आहे , तसेच तिच्या एका मुलीला श्वसनाचा आजार असून, तिची विशेष काळजी घेण्याची गरज आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.
त्याचबरोबर महिलेची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. याआधीही एका शाळेची ती शिक्षिका होती, तिथं तिच्याविरोधात कोणतीही तक्रार नाही. संबंधित शाळेतून तिनं वर्षाच्या सुरुवातीलाच राजीनामा दिलेला आहे. मुंबई पोलिसांनी तिच्याकडून लिहून घेतलेला कबुलीजबाब हा मराठीतून होता, त्यामुळे तिला तो नीट समजला नव्हता. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करत कोर्टानं आरोपी शिक्षिकेला एका हमीदारासह 50 हजारांचा जामीन मंजूर केला आहे.
हा जामीन देताना कोर्टाने काही अटी लादल्या आहेत. या महिलेनं खटल्याच्या सुनावणीस नियमित हजेरी लावावी, कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुंबईबाहेर जाऊ नये, घरचा पत्ता, फोन नंबर कोर्टात जमा करावी. तसेच कोणत्याही प्रकारे संबंधित विद्यार्थ्याशी किंवा त्याच्या पालकांशी संपर्क करू नये. साक्षीपुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये, या अटी-शर्थीद्वारे शिक्षिकेला जामीन देण्यात आला आहे. यातील एकाही अटीचा भंग झाल्यास जामीन रद्द होईल, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.


