भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पारोळा रस्त्यावर काल (रविवारी, ता 27) रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला (Bhiwandi Accident News) आहे. संकेत पांडुरंग पाटील ( 28 वर्षे) असं या दुचाकीस्वाराचं नाव आहे. तलवली नाका परिसरात हा अपघात घडला असून या घटनेमुळे खोणी गावावर शोककळा पसरली आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संकेत पाटील हा काही कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून भिवंडीच्या दिशेने निघाला होता. दरम्यान, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे संकेत रस्त्यावर फरफटत गेला आणि ट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
कामासाठी निघाला अन् मृत्यूनं गाठलं –
मिळालेल्या माहितीनुसार, संकेत हा कामानिमित्त दुचाकीवरून भिवंडीच्या दिशेने निघाला होता. यावेळी, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर संकेत रस्त्यावर फरफटत गेला आणि पुढे ट्रक त्याच्या अंगावरून गेली, या भीषण घटनेमध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ संकेत पांडुरंग पाटील ( 28 वर्षे) याला भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पोलीस (Police) या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.
अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी –
या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. भिवंडी-वाडा, व मानकोली-अंजूर फाटा, चिंचोटी या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन चालक अहमदाबाद मार्गावर जाण्यासाठी भिवंडी-पारोळा हा मार्ग शॉर्टकट म्हणून वापरत आहेत. मात्र, या मार्गावर भरधाव वेगाने वाहने धावल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. स्थानिकांनी प्रशासनाला याविरोधात तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. जर तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर गावकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.


