रायगड : कोकणातील खवळलेल्या समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे एक बोट बुडाली. या बोटीत एकूण आठ मच्छीमार होते, त्यापैकी पाच जण पोहून किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले, तर तीन मच्छीमार बेपत्ता झाले. तटरक्षक दल, पोलीस, महसूल विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतींनी ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. अखेर सोमवारी या तीन बेपत्ता मच्छिमारांचे मृतदेह सापडले.
खांदेरी किल्ल्याजवळ बोट बुडाल्याच्या घटनेत बेपत्ता झालेल्या तीन मच्छिमारांचे मृतदेह अलिबाग तालुक्यातील दिघोडे, सासवणे आणि किहीम येथे सोमवारी आढळले. मासेमारीवर बंदी असतानाही उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांची ‘तुळजाई’ नावाची बोट शनिवारी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.


