सावंतवाडी : तालुक्यातील न्हावेली गावच्या उपसरपंच पदासाठी नुकतीच श्री अक्षय पार्सेकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री गजानन दळवी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी न्हावेली ग्रामपंचायतीला भेट देत गावच्या विविध अडचणींबाबत सदस्य आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. रोजगार आणि आरोग्याच्या प्रश्नांवर गावच्या पाठीशी ठामपणे राहण्याची आणि गावाच्या सहयोगातून परिवर्तन घडवून आणण्याची हमी श्री विशाल परब यांनी दिली.
यावेळी त्यांनी नवनिर्वाचित युवा उपसरपंच पदी निवड झालेल्या अक्षय पार्सेकर यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्री पार्सेकर यांनी गावच्या विकास कामांबाबत विशाल परब यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या श्री गजानन दळवी यांचाही श्री विशाल परब यांनी यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. गावच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर स्वतः लक्ष देऊन मार्गी लावेन, असे अभिवचन यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी ग्रामस्थांना दिले. गावाला भेट देत आपुलकीने गावच्या प्रश्नांबद्दल चर्चा केली यासाठी ग्रामस्थांनी श्री.विशाल परब यांचे आभार व्यक्त केले आहेत.
कार्यक्रम प्रसंगी युवा समाजिक कार्यकर्ते समिर पार्सेकर, रुपेश नाईक, तुळशीदास पार्सेकर, बंड्या दळवी, राज धवन, गजानन दळवी संदीप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.


