वैभववाडी : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात दिनांक ३१ जुलै रोजी ओरोस येथील नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सतर्फे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या विशेष प्रशिक्षण सत्रात आपत्तीपूर्व, आपत्तीदरम्यान व आपत्तीनंतर घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वैभववाडीचे नायब तहसीलदार दिलीप पाटील आणि नायब तहसीलदार शिवाजी सुतार, महसूल सहाय्यक विक्रांत सूर्यवंशी, तसेच NDRF टीमचे अधिकारी व जवान उपस्थित होते.

NDRF चे इन्स्पेक्टर प्रभीशा मॅडम, विजय मस्के आणि मुकुंद शेळके व इतर सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे आपत्ती काळातील तातडीच्या उपाययोजना, बचाव पद्धती, प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन प्रतिक्रिया याविषयीचे ज्ञान दिले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री.सज्जन काका रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या वेळी नायब तहसीलदार दिलीप पाटील यांनी सांगितले की, “आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी आत्मसात करून आपल्या गावातील लोकांपर्यंत पोचवावे. समाजात जनजागृती झाल्यास आपत्तीमुळे होणारे आर्थिक आणि जीवित नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश कारेकर आणि नियोजन प्रा. सतीश करपे आणि NCC चे प्रा. रमेश काशेट्टी यांनी केले तर आभार प्रदर्शन NSS चे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विजय पैठणे यांनी केले.


