लंडन : इंग्लंड विरुद्ध लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात येत असलेला पाचवा आणि अंतिम कसोटी सामना हा भारतासाठी ‘करो या मरो’असा आहे. इंग्लंड या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून रोखण्यासाठी कोणत्याही स्थितीत पाचवा कसोटी सामना जिंकणं बंधनकारक आहे. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजासाठी भाग पाडलं. भारताच्या फलंदाजांनी पहिल्या डावात निराशा केली. भारताची 6 बाद 153 अशी स्थिती झाली. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला. मात्र करुण नायर याने वॉशिंग्टन सुंदर याच्या मदतीने भारताला सावरलं. करुणने या दरम्यान झुंजार खेळी करत अर्धशतक झळकावलं. करुणने यासह टीम मॅनेजमेंटचा त्याला पुन्हा संधी देण्याचा निर्णय योग्य ठरवला. करुणला इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये संधी देण्यात आली. करुणला या 3 सामन्यांमधील 6 पैकी काही डावांत अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र करुणला त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. करुणने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचला होता. त्यामुळे करुणकडून या दौऱ्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र करुणला पहिल्या 3 सामन्यांमध्ये क्रिकेट चाहत्यांना अपेक्षित असलेली खेळी करता आली नाही. त्यामुळे करुणला चौथ्या सामन्यातून बाहेर करण्यात आलं. मात्र टीम मॅनेजमेंटने करुणवर पाचव्या सामन्यात शार्दूल ठाकुर याच्या जागी संधी देत विश्वास दाखवला. करुणने हा विश्वास सार्थ ठरवला आणि गरजेच्या क्षणी अर्धशतक झळकावलं.
करुणचं झुंजार अर्धशतक –
जेकब बेथेल याने टाकलेल्या 62 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 2 धावा घेत करुणने अर्धशतक पूर्ण केलं. करुणने यासह अखेर 3 हजार पेक्षा अधिक दिवसांची प्रतिक्षा संपवली. करुणने 3 हजार 147 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकलं. करुणने 89 चेंडूत 57.30 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक केलं. करुणने या दरम्यान 7 चौकार लगावले.
आता मोठ्या खेळीची आशा –
करुणच्या अर्धशतकासह भारताने पहिल्या डावात 200 धावांचा टप्पाही पार केला. भारताची धावसंख्या 61.1 षटकानंतर 6 बाद 201 अशी झाली आहे. तसेच सुंदर आणि करुण या दोघांमध्ये 48 धावांची नाबाद भागीदारी झाली आहे. त्यामुळे या जोडीकडून भारताला आणखी मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे. ही जोडी सातव्या विकेटसाठी किती रन्सची पार्टनरशीप करतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.


