यवतमाळ : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, या निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं. दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना लागलेली गळती ही महाविकास आघाडीसाठी सध्या डोकेदुखीचा विषय ठरला आहे. याचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गटाला बसत असल्याचं दिसून येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात, परंतु त्यापूर्वीच सिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या शिवसेना ठाकरे गटातील तसेच काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक जिल्हा परिषद सदस्य, तसेच माजी नगराध्यक्षांचा समावेश आहे, सोबतच अनेक सरपंच आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यवतमाळचे तेजस ठाकरे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
अनेक सरपंच , अनेक जिल्हापरिषद सदस्य , माजी नगराध्यक्ष यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यांचे मी स्वागत करतो. या सर्वांच्या प्रवेशामुळे संजय राठोड यांची विजयी घोडदौड सुरू आहे ती अजून मजबूत होईल. तुमचा खऱ्या शिवसेनेत स्वगृही प्रवेश झाला हे मी जाहीर करतो. अडीच वर्षात राज्यात जी कामं झाली विकास झाला , लाडकी बहीण लाडका भाऊ सर्वांना चांगले दिवस आणण्याचे काम सरकारने केले, 232 जागा महायुतीला मिळाल्या लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केले, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


