मालवण : तालुक्यातील वेताळगड येथे दुर्ग मावळा तर्फे मॉन्सून ट्रेकचे आयोजन करण्यात आलेले होते त्याला दुर्ग प्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर भ्रमंतीला ५५ दुर्ग प्रेमींनी सहभाग घेतला. यावेळी गडावर वृक्षारोपणही करण्यात आले.
दुर्गप्रेमींना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गडकिल्यांची भ्रमंती घडवून आणण्याच्या उद्देशाने दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने पावसाळ्यात विविध गडकिल्यांची भ्रमंती आयोजित करण्यात येते. यावेळी वेताळगड वर सदर भ्रमंती आयोजित करण्यात आलेली होती.
या भ्रमंतीमध्ये सहभागी दुर्ग प्रेमींना गडाचा इतिहास सांगण्यात आला. तसेच गडावरील विविध ठिकाणे दाखवून त्याबद्दल माहिती सांगण्यात आली. गडावर जांभळाची दहा झाडे लावण्यात आली.
सदर मोहिमेला चार वर्षाच्या मुलापासून चौसष्ट वर्षाच्या आजी तसेच पेंडूर हायस्कुलचे १० वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. राजेंद्र गोसावी यांनी भ्रमंती दरम्यान आपल्या कवितांनी दुर्गप्रेमींना मंत्रमुग्ध केले. तसेच इतरांनी पोवाडे सादर केले. शेवटी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.


