जळगाव : जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह १ लाख ४ हजार ३० रुपयांवर पोहोचले असून इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक दर आहेत. जळगावच्या सराफ बाजारात गेल्या पाच दिवसांत सोन्याच्या दरात २ हजार ५७५ रुपयांनी वाढ झाली आहे. रक्षा बंधनापूर्वीच मौल्यवान धातुने तुफान भरारी घेतली आहे. त्यामुळे ग्राहकांचे उरलेसुरले खरेदीचे अवसान गळाले आहे. टॅरिफ वारचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
चांदीने घेतली भरारी –
चांदीच्या दरात गेल्या २४ तासात २ हजारांनी वाढ होऊन चांदीचे दर जीएसटीसह १ लाख १७ लाख ४२० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे चांदीसाठी सुद्धा ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे समोर येत आहे. रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवरून भारत-अमेरिकेतील वाढता तणाव आणि भारतावर भरमसाट कर लादण्याची ट्रम्प यांच्या नव्या धमकीमुळे सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्याचे सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे. टॅरिफ इम्पॅक्टमुळे सोन्याच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे.
देशभरात सोने-चांदी महाग –
इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स एसोसिएशन (IBJA) नुसार, गुरुवारी, 7 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,00,452 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती. तर चांदीची किंमत 1,13,485 रुपये प्रति किलो आहे. 5 ऑगस्टच्या तुलनेत 6 ऑगस्ट रोजी सोने 376 रुपयांनी महागले. तर चांदीत 1,063 रुपयांची दरवाढ झाली. आज 995 शुद्ध सोने 1,00,050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. तर 916 शुद्ध सोने (22 कॅरेट) 92,014 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 750 शुद्ध (18 कॅरेट) सोने 75,339 रुपये प्रति 10 ग्रॅमने विक्री होत आहे. 585 (14 कॅरेट) शुद्ध सोन्याची किंमत 58,764 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे.
सोन्याची शुद्धता –
भारतीय मानके संस्थेद्वारे (Indian Standard Organization-ISO) सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. या दोन्ही प्रकारच्या सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते.


