सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालय समस्यांचे माहेरघर बनले आहे. चांगले काम करूनही येथील सुरक्षा कर्मचारी, सफाई कामगार, स्वयंपाक करणाऱ्या महिला कर्मचारी यांना मागील तब्बल सहा महिने पगार नाही. तसेच येथील महत्त्वाची मंजूर असलेली 17 पैकी तब्बल दहा पदे रिक्त आहेत. तसेच रुग्णांना अनेकदा येथे सुविधा न मिळाल्यास गोवा किंवा अन्यत्र जावे लागते. अशा विविध समस्या लक्षात घेता रुग्णांची प्रचंड हेडसांड होत असते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी बुधवारी सावंतवाडी येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे सैनिक येथे दाखल झाले.

यावेळी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. गिरीश चौगुले यांच्याशी विविध समस्यांबाबत संवाद साधला. यावेळी वैद्यकीय अध्यक्ष डॉ. ऐवळे व डॉ. चौगुले यांनी शासनस्तरावर येथील समस्यांबाबत आपण केलेले पाठपुरावे सादर केले.
दरम्यान विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेत आगामी काळात येथील परिस्थिती सुधारण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करून जनतेला न्याय मिळवून देऊ, असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते दिनेश गावडे, विनायक रांगणेकर, विक्रांत देशपांडे, कृष्णा धुळपणावर, हितेन नाईक, साईराज नार्वेकर, रोहन धुरी, अथर्व केसरकर,तेजस मेस्त्री, ऋतिक कोरगांवकर, पीयुष टिळवे, अनिरुद्ध सावंत, संकल्प धारगळकर, नंदन उपरकर, धनु मोरजकर, शुभम हिर्लेकर, गौतम देसाई आदि उपस्थित होते.


