मुंबई : भारतीय जनता पार्टी हा केवळ एक पक्ष नसून तो एक परिवार आहे. इथे मतभेद शक्य असतात, पण मनभेद होत नाहीत हे अनेकदा सिद्ध झाले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे युवा नेतृत्व विशाल परब यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणारा पक्षप्रवेश याच अर्थाने अनेक शुभसंकेत देणारा ठरणार आहे.

उद्योजक श्री विशाल परब हे भारतीय जनता पार्टी वर निस्सीम प्रेम असणारे नेतृत्व! पण आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विकासाबाबत त्यांच्या मनातील काही गणिते ही पक्की होती. समज गैरसमजातून प्राप्त परिस्थितीवर नाराज होत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. महायुतीच्या बंधनाचा भंग होत असल्याने भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी असणाऱ्या या युवा नेतृत्वावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली. अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असतानाही सगळ्या आव्हानांना तोंड देत श्री विशाल परब यांनी जवळपास ३४ हजार मते मिळवत अनेक राजकीय तज्ञांना आश्चर्याचा धक्का दिला. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील ही मतांची गणिते राजकीय तज्ञांना विचार करायला लावणारी होती. त्यातही अपक्ष निवडणूक लढवूनही श्री विशाल परब यांची भाजपाच्या विचारधारेवरील श्रद्धा यत्कींचीतही कमी झाली नव्हती. महाविकास आघाडीकडून अनेक वेळा आलेली आमंत्रणे त्यांनी धुडकावून लावली होती.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अनेक कार्यकर्त्यांशी त्यांची व्यक्तिगतरीत्या नाळ जोडलेली होती. आपल्या दानशूर स्वभावातून त्यांनी समाजातील अडीअडचणीतल्या लोकांना ते वेळोवेळी मदत करत आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाचा पक्षाला या मतदारसंघात निश्चितपणे उपयोग होणार यात शंका नाही. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर रुसव्या फुगव्यातून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा हाताला पकडून पक्षकार्यासाठी जोडायचा अक्षरशः धमाका लावला आहे. पक्षाशी चर्चा करून त्यांनी विशाल परब या युवा नेतृत्वाला पुन्हा एकदा पक्षाच्या प्रवाहात ओढण्याचा निर्णय घेतला.

अशा अनेक सक्षम कार्यकर्त्यांच्या योगदानातून पक्षाला बळकटी मिळणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे कमळ पुन्हा एकदा समर्थपणे फुलणार आहे हा अनेक राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे कठोर शिस्तीचे आणि बेधडकपणे आव्हानांना भिडणारे नेते म्हणून ओळखले जातात. ज्या वेगाने ते सक्षम कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचा धडाकेबाज कार्यक्रम राबवत आहेत, त्याचे राजकीय क्षेत्रात मोठे औत्सुक्य राहिले आहे. श्री विशाल परब यांच्या पक्षात परतण्यामुळे तळकोकणात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची मुळे मजबूत होताना दिसत आहेत. उद्योजक विशाल परब यांचा भाजपातील प्रवेश हा घराला घरपण देणारा प्रवेश मानला जात आहे.


