बांदा : येथील कट्टा काॅर्नर व महामार्गा नजिक असलेले गॅरेज व छोटी दुकाने अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी फोडली. काही ठराविक रक्कम चोरट्यांनी लंपास केली. बांदा ब्रीजवरील लाईट बंद असल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केला आहे.
महामार्गावरील ब्रीजचे काम गेली तीन वर्षं चालू आहे. या काळात महामार्गावरील लाईट बंद करण्यात आल्या होत्या याच संधीचा फायदा घेत चोरटे येथील दुकाने रात्रीच्या वेळी फोडण्यात यशस्वी होत आहेत. या ब्रिजवरील लाईट गणेश चतुर्थीपूर्वी तरी चालू कराव्यात, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केली आहे.

तसेच बांदा पोलिसांनी सुद्धा या ऐन चतुर्थीच्या काळात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली. सध्या गणेश चतुर्थी जवळ आल्याने दुकानदारांनी आपल्या दुकानात सामान मोठ्या प्रमाणात भरले आहे. तरी अशा प्रकारच्या चोर्यांना आळा बसणे गरजेचे असल्याचे मिलिंद सावंत यांनी म्हटले आहे.


