सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव जाधववाडी येथील अपर्णा बाबुराव कदम (वय ४०) या महिलेने राहत्या घरात छपराच्या वाशाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना काल गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेची माहिती मृत महिलेचे दीर कृष्णा अर्जुन कदम यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
फिर्यादीच्या पुतणीने आपले काका कृष्णा कदम यांना कॉल करून आई दरवाजा उघडत नाही,असे सांगितले. त्यावेळी कृष्णा कदम यांनी तात्काळ कोलगाव येथे घरी धाव घेतली. तेथे पाहिले असता घराचा दरवाजा आतून बंद स्थितीत होता. त्यामुळे त्यांनी घराच्या छपरावर चढून लाकडी बांबूने दरवाजाची कडी उघडत आत प्रवेश केला. तेव्हा अपर्णा या गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आल्या. तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. महिला पोलीस अधिकारी माधुरी मुळीक व पोलीस हवालदार मनोज राऊत, रंजिता चौहान यांनी घटनास्थळी पंचनामा केला.आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.तिच्या पश्चात दोन मुली आहेत.


