सावंतवाडी : येथील माजी नगरसेवक तथा भाजप मंडळ माजी उपाध्यक्ष गुरुदास श्रीपाद मठकर यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना पत्र लिहून आपण भाजप पक्ष सोडत असल्याचे कळविले आहे.
दरम्यान, श्री.मठकर यांनी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, मी गुरुदास श्रीपाद मठकर भारतीय जनता पार्टीचा पदसिद्ध सदस्य होतो. सावंतवाडी शहरामध्ये माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे साहेब व जिल्ह्याचे आमचे लाडके पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी शहरामध्ये भाजपची दोन नंबरची सभासद नोंदणी मी केली आहे. मागच्या लोकसभ, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला एक नंबरचा लीड मी माझ्या प्रभागामध्ये मिळून दिला आहे. मी कधीही बंडखोरी किंवा पक्षविरोधी काम केले नाही, तरीसुद्धा माझ्यावर खोटे आरोप करून मला संपूर्ण जिल्ह्यात बदनाम करण्यात आले आहे.
मी सदैव सन्माननीय श्री. राणे साहेब व त्यांच्या कुटुंबीयांशी प्रामाणिक राहिलो आहे आणि राहणार आहे. तरी नाईलाजाने मला भाजप पक्ष सोडायला प्रवृत्त करण्यात येत आहे. त्यामुळे मी भाजप पक्ष सोडत आहे, असे गुरुदास मठकर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


