मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत ते आझाद मैदानावर पोहोचतील. कोर्टाने आझाद मैदानावर आंदोलन करण्यास त्यांना परवानगी नाकारलीये. मात्र, पोलिसांनी काही अटी घालून त्यांनी फक्त एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली आहे. मात्र, दुसरीकडे जरांगे पाटील हे बेमुदत आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. यासोबतच पोलिसांनी आझाद मैदानावरील आंदोलनासोबतच काही महत्वाच्या अटी देखील घातल्या आहेत. आज रात्री उशिरा जरी मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात पोहोचणार असतील तरीही सकाळपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त आझाद मैदानावर बघायला मिळतोय.
काही समर्थक देखील आझाद मैदानावर पोहोचले आहेत. स्वयंपाक बनवण्याचे पूर्ण साहित्य आझाद मैदानावर पोहोचले आहे. मात्र, पोलिसांकडून आझाद मैदानावर स्वयंपाक बनवण्यास परवानगी नाकारण्यात आलीये. दुसरीकडे ओबीसी समाजाचा ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध आहे. राज्याच्या राजधानीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामध्येच आता सरकारने सावध भूमिका घेतल्याचे बघायला मिळतंय.
मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलनासाठी निघालेले मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी आज सकाळी 11 वाजता अहिल्यानगर येथे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात महत्वाची चर्चा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांची शिष्टाई कामी येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम असल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र, आता चर्चेमधून मार्ग काढण्यास उदय सामंत आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना यश मिळते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे काैतुक करताना दिसले आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना सूचना देत म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल भाष्य करणे टाळा.


