बंगळुरू : शुबमन गिल याने कसोटी कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या मालिकेत इंग्लंड विरुद्ध अप्रतिम कामगिरी केली. शुबमनने कॅप्टन आणि बॅट्समन या दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करुन आपला ठसा उटमटवला आणि अनेक विक्रम मोडीत काढले. शुबमनने इंग्लंड दौऱ्यातील 5 कसोटी सामन्यांमध्ये 4 शतकं आणि 1 द्विशतरासह 700 पेक्षा अधिक धावा केल्या. तसेच भारताला 2 सामन्यांमध्ये विजयी केलं. भारताने शुबमनच्या नेतृत्वात मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. इंग्लंड दौऱ्यानंतर शुबमनला आशिया कप स्पर्धेसाठी टी 20i संघात उपकर्णधार म्हणून संधी देण्यात आली. मात्र शुबमन दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी आजारी पडला. शुबमनला आजारामुळे या स्पर्धेतील सामन्याला मुकाव लागलं. शुबमनकडे दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी नॉर्थ झोन संघाच्या नेतृत्वाची धुरा होती. मात्र शुबमनच्या आजारामुळे दुसऱ्या खेळाडूला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. त्याच खेळाडूने शतक ठोकलं. नॉर्थ झोनचा कॅप्टन अंकीत कुमार याने शतक ठोकत स्पर्धेत अप्रतिम सुरुवात केली.
अंकीत कुमारकडे नेतृत्वाची जबाबदारी –
शुबमन दुलीप ट्रॉफीत कॅप्टन म्हणून खेळणार असल्याचं निश्चित होतं. मात्र ऐन वेळेस शुबमन आजारी पडला आणि चित्र बदललं. त्यामुळे उपकर्णधार असलेल्या अंकीतला कर्णधार करण्यात आलं. अंकीत देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत हरयाणासाठी खेळतोय. अंकीतने गेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत हरयाणासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला होता. त्यामुळे अंकीतकडे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत अशाच कामगिरीची आशा होती. अंकीतने तो विश्वास सार्थ ठरवला. अंकीतला ईस्ट झोन विरूद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र अंकीतला त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. अंकीत पहिल्या डावात 30 धावांवर बाद झाला. मात्र अंकीतने दुसऱ्या डावात कमाल केली.
नॉर्थ झोनकडे पहिल्या डावात 175 धावांची आघाडी होती. त्यात अंकीतने शतक ठोकलं. अंकीत यश धुळ याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 240 धावांची द्विशतकी भागीदारी केली. अंकीत व्यतिरिक्त यशनेही शतक ठोकलं. मात्र यश 133 धावांवर बाद झाला. तर अंकीतने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 168 धावा केल्या. नॉर्थ झोनने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 388 धावा केल्या आहेत. नॉर्थ झोनने अशाप्रकारे 563 धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे.


