मुंबई : अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन झालं. वयाच्या 38 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. कॅन्सरशी झगडून प्रिया पुन्हा एकदा काम करायला लागली होती. नाटक, मालिकांमधून ती आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. परंतु अखेर आज (रविवार) तिची झुंज अयशस्वी ठरली. दोन वर्षांपूर्वी प्रिया ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. परंतु आजारपणामुळे तिने ही मालिका मधेच सोडली होती. याविषयी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला होता. या मालिकेत ती मोनिका कामतची भूमिका साकारत होती.
व्हिडीओमध्ये प्रियाने तिच्या आजारपणाविषयी माहिती दिली होती. “‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत तुम्ही मला मोनिका कामत या भूमिकेत पाहत होता. होता अशासाठी म्हणतेय कारण यापुढे मी ती भूमिका साकारणार नाहीये. अचानक आलेली तब्येतीची अडचण यामुळे मला ही भूमिका सोडावी लागतेय. मोनिका कामत हे कॅरेक्टर करताना मला खरंच खूप मजा येत होती. हे कॅरेक्टर तुम्हालाही खूप आवडत होतं, तुम्ही याच्यावर प्रचंड प्रेमही केलंत. पण जो वेळ मी त्यांना देऊ शकत होते, तो कुठेतरी अपुरा पडत होता. बाकी कलाकारांच्या अॅडजस्टमेंट्स म्हणा, प्रॉडक्शन टीम, क्रिएटिव्ह टीम.. तो रोल इतका डिमांडिंग होता.. या सगळ्यात कारणांमुळे मला या मालिकेचा निरोप घ्यावा लागतोय”, असं तिने सांगितलं होतं. प्रियाचा हा व्हिडीओ आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2023 मध्ये प्रियाने ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेला रामराम केला होता. तिने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. ‘चार दिवस सासूचे’मध्येही ती झळकली होती. त्यानंतर ‘कसम से’ या मालिकेतून तिने हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेत तिने वर्षाची भूमिका साकारली होती. ‘बडे अच्छे लगते है’ या गाजलेल्या मालिकेत ती ज्योती मल्होत्राच्या भूमिकेत होती. प्रिया मराठेनं 24 एप्रिल 2012 रोजी अभिनेता शंतनू मोघेशी लग्न केलं होतं.


