सावंतवाडी : मटका जुगार स्वीकारल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी कोलगाव येथील एकाला अटक केली असून त्याच्या समवेत मटका बुकी अशी मिळून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई काल सायंकाळी करण्यात आली. संजय वसंत नाईक (वय ५६) रा. कोलगाव – निरुखेवाडी आणि मुजीब शेख (रा. सावंतवाडी) असे त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून २० हजार रुपयांच्या मोबाईलसह जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य व रोख ११००/ रुपये जप्त केले आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, कोलगाव येथे मटका स्वीकारली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या पथकाने ओमकार जनरल स्टोअरसमोर छापा टाकला. यावेळी नाईक हा आपल्या पान टपरीवर मोबाईलद्वारे व्हाट्सअअँपवर मटका जुगाराचे आकडे घेत असताना रंगेहाथ सापडला. चौकशीत त्याने हे आकडे सावंतवाडी येथील मुजीब शेख या बुकीला पाठवत असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी संजय नाईक आणि मटका बुकी मुजीब शेख अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शिंदे, जमादार निलेश परब, हवालदार अनिल धुरी आणि महेश जाधव यांनी ही कारवाई यशस्वी केली. या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना चाप बसला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


