कोलंबो : रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण, इस्रायल हमास यांच्यातील संघर्षामुळे जगात आता तिसरे महायुद्ध चालू होते की काय? असा सवाल उपस्थित केला जातो. सध्याची जागतिक परिस्थिती पाहून या युद्धाचे ढग गडद झाल्याचेही म्हटले जाते. असे असतानाच आता श्रीलंकेतील नोबेल पुरस्कार विजेते मोहन मुनासिंघे यांनी जगापुढे असलेल्या अणुयुद्धाच्या धोक्याबद्दल सतर्क केले आहे.

नुकतेच चीनमध्ये एससीओ शिखर परिषद पार पडली. या बैठकीतील चीन, रशिया आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवरही भाष्य केले आहे. चीन, रशिया आणि भारत हे आशियातील सर्वांत शक्तीशाली देश आहेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच अणुयुद्धाच्या शक्यतेवर केलेल्या एका जुन्या विधानावरही यावेळी भाष्य केले. फक्त भारत किंवा श्रीलंकेसाठीच नव्हे तर संपूर्ण आशियाने जगाला शांतता आणि स्थिरताचा रस्ता दाखवण्याची ही वेळ आहे, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी आता अणुयुद्ध अगोदरपेक्षा फार जवळ आले आहे. या संभाव्य युद्धाला आपण कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे. विश्वशांती ही अमुक देशाच्या सरकारपेक्षा आपल्या सामान्यांवरही अवलंबून आहे, असे यावेळी मुनासिंघे म्हणाले.

पृथ्वी तसेच स्वत: ला वाचवण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे. शांतीसाठी आपण एकत्र मिळून काम करूया, असेही आवाहन त्यांनी केले.


