मुंबई : क्रिकेट चाहत्यांची गेल्या अनेक दिवसांची प्रतिक्षा अवघ्या काही तासांनंतर संपणार आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्याच्या महिन्याभरानंतर एक्शन मोडमध्ये दिसणार आहे. बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेला आज मंगळवार 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताकडेच आहे. मात्र भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेतील सर्व सामने हे यूएईमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेबाबत महत्त्वाची माहिती आपण सविस्तररित्या जाणून घेऊयात –
आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 8 संघ सहभागी होणार आहेत. याआधी फक्त 6 संघ या स्पर्धेत खेळत होते. मात्र बदलेल्या नियमांमुळे यंदा 6 ऐवजी 8 संघात चुरस पाहायला मिळणार आहे. या 8 संघांना 4-4 प्रमाणे 2 गटात विभागलं गेलं आहे. ए ग्रुपमध्ये 2 कट्टर प्रतिस्पर्ध्यांसह तुलनेत 2 नवखे संघ आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा समावेश आहे. यूएई यजमान आहे. तर ओमानची या स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ आहे.तसेच बी ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँगचा समावेश आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेत एकूण 8 संघात 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान एकूण 19 सामने होणार आहेत. त्यानुसार साखळी फेरीत 12 आणि सुपर 4 मध्ये 6 सामने होणार आहेत. तर 28 सप्टेंबरला महाअंतिम सामन्यात विजेता निश्चित होईल. साखळी फेरीत प्रत्येक संघ 3-3 सामने खेळले. दोन्ही गटातून प्रत्येकी 2-2 संघ सुपर 4 साठी पात्र ठरतील. त्यानंतर सुपर 4 मधील 2 अव्वल संघ अंतिम फेरीत पोहचतील. त्यानंतर महाविजेता निश्चित होईल.
टीम इंडिया गतविजेता –
टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील गतविजेता आहे. भारताने 2023 साली वनडे फॉर्मटेने झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेवर मात करत आशिया कपवर नाव कोरलं होतं. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केली होती. मात्र यंदा टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्यासमोर ट्रॉफी कायम ठेवण्याचं आव्हान आहे.
सामने मोबाईल आणि टीव्हीवर कुठे पाहता येतील?
आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. तसेच लाईव्ह मॅच मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहता येतील.
2 स्टेडियम आणि 19 सामने –
या स्पर्धेतील सर्व सामने हे 2 स्टेडियममध्ये होणार आहे. एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेने दिलेल्या माहितीनुसार दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये या सामन्यांचा थरार रंगणार आहे. तसेच स्पर्धेतील सामन्यांना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे.


