अमळनेर (जि. जळगाव) : सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रीय भूमिका बजावणारी व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना केवळ माध्यमांपुरती मर्यादित न राहता कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण करत आहे. याच उद्देशाने अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर देवस्थानच्या सभागृहात संघटनेच्या दोन दिवसीय केडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी आमदार पाटील म्हणाले, “व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने आजवर घेतलेली भूमिका ही ठाम आणि लोकहिताची राहिली आहे. अनेकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य जनतेसमोर निर्माण होणाऱ्या प्रश्नांना या संघटनेने नेहमीच आवाज दिला आहे. माझ्याही कार्यकाळात त्यांच्या उपक्रमांची मदत उपयुक्त ठरली आहे.”
या कार्यक्रमाला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, महासचिव दिव्या भोसले, तसेच राज्यभरातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते.
या दोन दिवसीय केडर कॅम्पमध्ये कार्यकर्त्यांना पत्रकारिता, सामाजिक जबाबदारी, जनसंवाद कौशल्य आणि आंदोलनाची रणनीती यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संघटनेच्या कार्याला नवी दिशा देण्याचा आणि युवा नेतृत्व तयार करण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतिशय प्रभावी पद्धतीने दिव्या भोसले यांनी केले.
दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे व्हॉईस ऑफ मीडियाच्या पत्रकार बांधवांमध्ये ऊर्जा आणि नवा उत्साह संचारला.