अमळनेर :“पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ मानला जातो; मात्र पत्रकारांची अवस्था आजही हालाखीचीच आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, नाहीतर परिस्थिती आणखी बिकट होईल,” असे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले.
अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह सेवा संस्था या ठिकाणी आयोजित व्हॉईस ऑफ मीडिया केडर कॅम्प प्रसंगी ते बोलत होते.
म्हस्के यांनी सांगितले की, व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची स्थापना प्रतिकूल परिस्थितीत झाली. गेल्या काही वर्षांत पत्रकारितेत मोठे बदल झाले, पण पत्रकारांची परिस्थिती मात्र सुधारली नाही. “गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत अनेक नेतृत्व घडवणारा पत्रकार स्वतः ‘घरकुला’साठी झगडतो. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून गौरवले जात असूनही पत्रकाराच्या जीवनात अंधारच आहे,” स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली, तरीही पत्रकाराची खरी व्याख्या समजली गेली नाही, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकारांच्या महामंडळासाठी दोन वर्षांपासून सुरू असलेला लढा अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने पत्रकारांच्या घरकुलाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील कॅम्पपासून सुरुवात केली. तेथे पत्रकारांना दहा लाख रुपयांचा विमा संरक्षण देण्यात आला. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आज संघटनेची व्याप्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापासून देशभर पसरून थेट ५६ देशांपर्यंत पोहोचली आहे. मात्र, पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत असून कायद्यात तरतुदी असतानाही अद्याप एकाही घटनेत गुन्हा नोंदवला गेला नाही, हे गंभीर वास्तव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“पत्रकारांच्या प्रश्नांसाठी लढणारी खरी ताकद म्हणजे व्हॉईस ऑफ मीडिया आहे. या संघटनेमुळेच पत्रकारांच्या हक्कांच्या लढ्याला बळ मिळत आहे,” असे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी ठामपणे सांगितले.


