सावंतवाडी : शासनाने रेकॉर्डवर नसलेल्या गावातील रस्ते, पाणंद आणि पायवाटांच्या नोंदी घेण्याचा उपक्रम सुरू केला असून, त्या पार्श्वभूमीवर सातार्डा ग्रामपंचायतीची 15 सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामसभा गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आली. ही ग्रामसभा आता बुधवार, 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. तरी या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू यांनी केले आहे.
यावेळी ग्रामसेवक कुणाल मस्के, ग्रामपंचायत सदस्य उत्कर्ष पेडणेकर, शर्मिला मांजरेकर, वासुदेव राऊळ, विनिता गोवेकर ज्ञानदीप राऊळ सगुण गोवेकर संतोष गोवेकर संजय पवार निवृत्त शिक्षक सोनू पवार संतोष पवार, श्री जाधव आणि इतर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सरपंच उदय पारिपत्ते यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.

(फोटो – सातार्डा येथे तहकूब ग्रामसभेनंतर बैठकीत मार्गदर्शन करताना सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू सोबत ग्रामसेवक कुणाल मस्के तलाठी मनोज तुळसकर व ग्रामपंचायत सदस्य.)
चार रस्त्यांसाठी भूसंपादन करण्याची मागणी ग्रामसभा झाली नसली तरी, सरपंच संदीप प्रभू यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना गावातील चार रेकॉर्ड नसलेल्या रस्त्यांची माहिती दिली. महसूल विभागाच्या मदतीने या रस्त्यांची पाहणीही करण्यात आली आहे. हे चार रस्ते पूर्वापार वापरात असले तरी, ग्रामपंचायतीचे जुने रेकॉर्ड गहाळ झाल्यामुळे त्यांचे डांबरीकरण किंवा खडीकरण करणे शक्य होत नाही. त्यामुळे शासनाच्या महसूल विभागाने या रस्त्यांचे भूसंपादन करून त्यांचे बांधकाम करावे, या रस्त्यासाठी जागा देण्यास जमीन मालक विरोध करत असून त्यामुळे हे रस्ते खडीकरण डांबरीकरणापासून वंचित राहिले आहेत.यात भटपावणी,पालवणवाडी, जाधववाडी आणि केरकरवाडी ते तरचावाडा या रस्त्यांचा समावेश आहे.
तलाठ्यांनी माहिती गोळा केली या मागणीला पाठिंबा देण्यासाठी गावाचे तलाठी मनोज तुळसकर यांनी संबंधित रस्त्यांच्या सातबारा आणि इतर आवश्यक कागदपत्रे गोळा केली आहेत. बुधवारी होणाऱ्या ग्रामसभेत या संदर्भात ठराव पारित करून तो तातडीने महसूल विभागाकडे पाठवला जाणार आहे.
ग्रामसभा आणि पंतप्रधानांचा वाढदिवस विशेष म्हणजे, बुधवारी होणाऱ्या ग्रामसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्याचेही नियोजन करण्यात येणार आहे.


