- आजगाव ते हनुमान मंदिरपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे प्रवास करणे जीवघेणे!
सावंतवाडी : तालुक्यातील धाकोरे गावातून जाणारा आजगाव ते हनुमान मंदिर पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे सध्या या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जिगरीचे बनले आहे.
गावातील रस्ते हे वळणावळणाचे असून या रस्त्यावरून प्रवास करायचा म्हणजे जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.त्यात करून या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे तर धोका अधिकच वाढला असून,या संबंधी धाकोरे ग्रामपंचायत च्या वतीने ही वाढलेली झाडी तोडण्याबाबत मागील महिन्यात बांधकाम विभागाकडे निवेदन दिले होते.यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाबाबत लवकरात लवकर काम करू असे आश्वासन दिले होते.मात्र सध्या या विभागाला या आश्वासनांचा विसर पडल्याचे दिसत आहे.

त्यामुळे येथील ग्रामस्थ ,वाहनचालकात असंतोष पसरला असून,एखादी दुर्घटना घडली तरच काम हाती घेणार का? असा संतप्त सवाल केला जात आहे.
एखाद मोठ वाहन या रस्त्यावरून जात असेल तर वाहनांना बाजू देताना वाहन धारकांचा खूपच कसरत करावी लागत आहे.त्यामुळे संबंधित विभागाने याबाबत तत्काळ दखल घेऊन वाढलेली झाडी तोडून पुढील होणारा अनर्थ टाळावा.


