कल्याण : कल्याणच्या शहाड स्टेशन परिसरात नवरात्रीच्या बॅनरवरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या हाणामारीत भाजपचे वॉर्ड अध्यक्ष मोहन कोणकर, शिंदे गटाचे मुकेश कोट आणि आणखी एक जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.
नेमकं काय घडलं?
हा वाद नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा बॅनरवरून सुरू झाला. शहाड स्टेशन परिसरात भाजपच्या वॉर्ड क्रमांक १५ चे अध्यक्ष मोहन कोणकर यांनी एक बॅनर लावण्यासाठी लोखंडी फ्रेम लावली होती. याच फ्रेमवर स्थानिक शिंदे गटाचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश कोट याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा बॅनर लावला. यामुळे चिडलेल्या मोहन कोणकर यांनी याबाबत मुकेश कोटला जाब विचारला. याचवेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. या वादावादीचं रूपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले.
जबरदस्त हाणामारी –
या मारामारीत शिंदे गटाचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश कोट आणि त्याच्या साथीदारांनी मोहन कोणकर यांना मारहाण केली. यात मोहन कोणकर यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली. मोहन कोणकर यांनीही प्रत्युत्तरादाखल मुकेश कोट यांना मारहाण केली. या झटापटीत मुकेश कोट आणि एक अनोळखी व्यक्तीही जखमी झाले. या घटनेनंतर परिसरातील वातावरण तापलं होतं. तसेच घटनास्थळी मोठी गर्दी जमली.
परस्परविरोधी गुन्हे दाखल –
या घटनेनंतर मोहन कोणकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात मुकेश कोट आणि त्याच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली. तर मुकेश कोटनेही मोहन कोणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात मारहाणीची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारींची नोंद घेऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान स्थानिक राजकारणात हाणामारीची ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. विशेषतः एकाच आघाडीत असलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या राड्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.


