कुडाळ : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आकेरी – हुमरस येथे माजी विद्यार्थी कृतज्ञता मेळावा उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संकल्पनेतून हा मेळावा आयोजित केला गेला. या मेळाव्यात फार मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. मेळाव्याचे अध्यक्ष स्थान श्री. आकेरकर सर यांनी भूषवले. या मेळाव्यात सर्व मान्यवरांचे व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे जल्लोषात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
मान्यवरांनी शिक्षक, मुख्याध्यापिका श्रीमती तळवणेकर मॅडम, श्री. डिगे सर तसेच श्रीमती बांदेलकर मॅडम व श्री. कालेलकर यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या मेळाव्याला माजी विद्यार्थी म्हणून या गावचे प्रथम नागरिक तथा विद्यमान सरपंच सीताराम तेली तसेच अशोक शिवलकर, विष्णू परब तथा बाबू काका, एकनाथ परब तथा नाथा काकाश्री, जनार्दन कदम, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश सावंत, हुमरस गावचे पोलीस पाटील हेमंत वारंग, माजी पोलीस पाटील सुरेश चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष कुंभार, संतोष पावसकर, महेश तथा दाजी वारंग आदी माजी विद्यार्थी, मान्यवर तसेच इतर माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. तळणेकर मॅडम यांनी प्रास्ताविक केले. या मेळाव्याचा शासनाचा काय हेतू आहे?, हे मॅडमांनी स्पष्ट केले. त्यानंतर शेखर देऊलकर, जनार्दन कदम, अशोक शिवलकर, सरपंच सीताराम तेली, हरी सावंत, गोपाळ सावंत, श्रीम. दिक्षा पटवर्धन, श्री. आकेरकर सर या माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा दिल्या. शाळेतील शिस्त, शाळेतील शिक्षक, शाळेत झालेले संस्कार आणि त्यामुळे आपण घडलो हे त्यांनी आवर्जून सांगितले. आपल्या यशाची गुरुकिल्ली ही प्राथमिक शाळाच आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले.
मनोगते झाल्यानंतर वरिष्ठ माजी विद्यार्थी श्री. आकेरकर सर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आकेरकर सरांनी आपले अध्यक्षीय भाषण केले व आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा दिला. शेवटी आभार व्यक्त करून मेळाव्याची सांगता झाली. विशेषताः जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा आभारात विशेष उल्लेख करण्यात आला सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. कालेलकर सर यांनी केले.


