दोडामार्ग : नैसर्गिक अधिवासातील हत्ती ‘वनतारा’ ला विकण्याचा ठेका आमदार दीपक केसरकरांना कोणी दिला,असा प्रश्न शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी विचारला आहे. नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या हत्तींना विकण्याचे धाडस कुणी करू नये,असा इशाराही त्यांनी दिला.
आमदार केसरकर सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.त्यांनी सांगितले की,सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थिरावलेल्या हत्तींपासून गेल्या अनेक वर्षात मोठ्या प्रमाणात नुकसान आणि जीवितहानी झालेली आहे. त्यामुळे नुकसान रोखण्यासाठी योग्य तो मार्ग काढायचा आहे.ओंकारसह अन्य हत्तींना पकडून वनतारामध्ये पाठविण्यासंदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी खुद्द वनमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. माझे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे वनतारामध्ये असलेले सर्व प्राणी सुरक्षित आहेत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेले हत्ती वनतारा मध्ये पाठवण्यात आल्यानंतर त्यांची योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हत्ती त्या ठिकाणी नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असेही केसरकर म्हणाले होते.
या त्यांच्या आणि सरकारच्या भूमिकेला धुरी यांनी विरोध केला. ते म्हणाले,सरकार आणि मंत्री मुकेश अंबानी यांच्या ओंजळीने पाणी पीत आहेत.त्यांना जनतेचे आणि वन्य प्राण्यांचे काही पडलेले नाही. अनंत मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या खासगी वनतारा या प्राणीसंग्रहालयात हत्ती नेऊन देण्यासाठी यांना मोठी रक्कम दिली जाणार आहे.त्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू झाला आहे.सत्तेचा गैरवापर करून आणि लोकांच्या नुकसानीचा मुद्दा भावनिक बनवून जंगली हत्तींना वनतारामध्ये नेण्याचा जिल्ह्यातील आमदार,खासदारांचा प्रयत्न आहे.पण, तो न्यायालयात दाद मागून हाणून पाडला जाईल, असेही धुरी यांनी सांगितले.


