सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचा सावंतवाडीतील राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने चेंबूर, मुंबई येथे झालेल्या दुस-या चेंबूर जिमखाना राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेत रेटिंग कॅटेगरीत प्रथम क्रमांक मिळवला. देशभरातील पाचशे खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. बाळकृष्णने उत्कृष्ट खेळ करत नऊ राऊंड्समध्ये सहा राऊंड्स जिंकून, दोन राऊंड्स बरोबरीत सोडवून सात गुण केले.
जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि करोडो बुद्धिबळप्रेमी पहात असलेल्या यु ट्युबवरील बुदधिबळ चॅनल “चेसबेस इंडिया”चे संस्थापक आणि इंटरनॅशनल मास्टर सागर शहा यांनी बाळकृष्णचे कौतुक करतानाच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बाळकृष्णला रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. बाळकृष्ण हा सावंतवाडीतील मुक्ताई अकॅडेमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर आणि उपाध्यक्षा सौ. स्नेहा पेडणेकर यांचा सुपुत्र आहे. सर्व स्तरातून बाळकृष्णचे कौतुक करण्यात येत आहे.


