दुबई : टीम इंडियाने टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील एकूण चौथ्या सामन्यात बांगलादेशवर मात केली आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 41 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये बांगलादेशसमोर 169 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशने गुडघे टेकले. टीम इंडियाच्या गोलंदाजंसमोर बांगलादेशला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने बांगलादेशला 19.3 ओव्हरमध्ये 127 रन्सवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाने यासह या स्पर्धेत सलग पाचवा विजय मिळवला. तसेच टीम इंडियाने या विजयासह अंतिम फेरीतही धडक दिली आहे.

अभिषेक शर्माची फटकेबाजी –
शिवम दुबे आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या तिघांनी निराशा केली. मात्र त्यानंतरही टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 168 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशसाठी रिशाद होसैन याने दोघांना आऊट केलं. तर तंझीम साकिब, मुस्तफिजूर आणि सैफुद्दीन या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
टीम इंडियाची बॉलिंग –
बांगलादेशला 169 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर जिंकणं सोडा धड 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 3 बॉलआधी ऑलआऊट केलं. बांगलादेशसाठी फक्त दोघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर इतरांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.
ओपनर सैफ हसनैन याने सर्वाधिक धावा केल्या सैफने 51 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरसह 69 रन्स केल्या. तर परवेझ एमोनने 21 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना 7 धावांच्या पुढे जाता आलं नाही. टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. वरुण चक्रवर्ती याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेल आणि तिलक वर्मा या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.
टीम इंडियाचा विजयी पंच –
टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग पाचवा विजय ठरला. टीम इंडियाने सुपर 4 आधी साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले होते. टीम इंडियाने साखळी फेरीत यूएई, पाकिस्तान आणि ओमानवर मात केली होती.
अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव या दोघांनी टीम इंडियाच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तसेच इतरांनीही चांगली साथ दिली. टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा याने सर्वाधिक 75 धावांचं योगदान दिलं. अभिषेकने या खेळीत 5 सिक्स आणि 6 फोर लगावले. अभिषेक व्यतिरिक्त टीम इंडियासाठी हार्दिक पंड्या याने 38 धावा जोडल्या. शुबमन गिल याने 29 धावांचं योगदान दिलं. तर अक्षर पटेल याने नाबाद 10 धावा केल्या.


