बीड : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मोठं नुकसान झालं आहे. शेती खरडून गेली आहे. तर शेतकऱ्याचं दिवाळीपूर्वी दिवाळं निघालं आहे. आभाळ फाटल्यानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. मंत्रिमंडळ बंधाऱ्यांवर पोहचले आहे. तर दादा मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.अजितदादा हे रोखठोक बोलतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्या बोलण्यातून वाद उद्भवतात. असाच प्रकार धाराशिवमधील परंडा तालुक्यात घडला. कर्जमाफीविषयी विचारताच अजितदादांचा पारा चढला आणि मग त्यांच्या वक्तव्यानं पुन्हा वाद उफाळला.
कालपासून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. पूरग्रस्त भागाचा त्यांचा पाहणी दौरा सुरूच आहे. सोलापूरनंतर ते धाराशिवच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर आज ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान परंडा येथे पूरग्रस्तांशी चर्चा करताना कर्जमाफीवरून दादा चांगलेच संतापल्याचे दिसले. एका तरुणाने त्यांना कर्जमाफीविषयी विचारले. त्यावेळी त्या तरुणाला उद्देशून दादांनी, “याला द्या रे मुख्यमंत्रीपद, सगळी सोंगं करता येतात पैशांचं सोंग करता येत नाही.” असं सुनावलं. इतक्यावरच न थांबता दादांनी, ”आम्ही इथं काय गोट्या खेळायला आलो का?” असे वक्तव्य केलं. ”मी 6 वाजल्यापासून दौऱ्यावर आहे. आम्हाला कळतं, जे काम करतात, त्यांचीच….” असं म्हणत त्यांनी या युवकाचं तोंड बंद केलं. लाडक्या बहिणीला 45 हजार कोटी देतोय याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
आज सकाळी अजितदादा बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींना हात जोडून विनंती केली. मुलं तुमच्या मोबाईलवर काय करतात याकडं लक्ष देण्यास सांगितले. एका महिलेचं उदाहरण देत तिचे सरकारी योजनेचे जमा पैसा मुलाने गेमिंगमध्ये गमावल्याचे त्यांनी सांगितले. तुमची मुलं काय करतात, काय नाही याकडं लक्ष द्या असं अजितदादा म्हणाले. संकट मोठं आहे आणि सरकार मदत करत असल्याचे ते म्हणाले.


