Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

जयवंत पाटील यांचे कार्य आदर्श व प्रेरणादायी – प्रमोद भागवत. ; मुख्याध्यापक जयवंत पाटील यांना रोटरीचा ‘आदर्श शिक्षक सन्मान’ पुरस्कार प्रदान.

सावंतवाडी :  तालुक्यातील दाणोली येथील कै. बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक जयवंत रामू पाटील यांना रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचा ‘आदर्श शिक्षक सन्मान’ पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. प्रमोद भागवत, इव्हेंट चेअरमन रो. सत्यजित देशमुख, पंचद्रविड ब्राह्मण पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश सप्ते, शासकीय बांधकाम व्यावसायिक अरविंद देशपांडे, सेवानिवृत्त शिक्षक भरत गावडे, व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, सत्कारमूर्ती मुख्याध्यापक जयवंत पाटील आदी उपस्थित होते.

 

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद भागवत म्हणाले, समाजातील चांगलं आणि विधायक कार्य करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांना रोटरीतर्फे दरवर्षी आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार प्रदान केला जातो. जयवंत पाटील यांनी अतिशय खडतर प्रवासातून या शाळेला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. मुख्याध्यापक पाटील यांचे कार्य आदर्श व प्रेरणादायी असून शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या इतरही शिक्षकांनी तो घ्यावा. श्री. पाटील यांच्या एकूणच शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेऊन रोटरीने त्यांना यंदाचा आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार प्रदान केला आहे. यापुढेही रोटरी नेहमीच या शाळेला सहकार्य करत राहील. विद्यार्थी – विद्यार्थिनींना सायकली वाटप असो किंवा शैक्षणिक साहित्य पुरविणे, याबाबत नेहमीच रोटरी या शाळेला व इतरही शाळांना सहकार्य करत राहील, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

यावेळी प्रमुख वक्ते प्रा. रुपेश पाटील म्हणाले, शिक्षक हा समाज घडविणारा अभियंता असून अनादी काळापासून गुरुजनांना समाजात मानाचे स्थान आहे. हे स्थान टिकवणे हल्लीच्या काळात फार अवघड झाले आहे. क्षेत्र कोणतेही असो त्याच्यात काम करताना अडचणी येतात. मात्र अडचणींवर मात करण्याचे कौशल्य शिक्षक आपल्याला प्रदान करीत असतात. म्हणून शिक्षक हे नेहमीच समाजाला एक सकारात्मक दिशा प्रदान करतात. त्यांना सलाम करण्याचा आजचा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

यावेळी वक्ते भरत गावडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करत मुख्याध्यापक जयवंत पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. दाणोली येथील श्री साटम महाराज वाचनालयाच्या वतीने घेण्यात येणारे विविध उपक्रम या शाळेत नेहमीच राबविले जातात. त्यात विविध विद्यार्थ्यांनी बक्षिसे देखील मिळ मिळवून आपला शाळेचा आलेख उंचावलेला आहे. ही पुण्यभूमी असून येथे काही कमी पडत नाही, असेही श्री. गावडे म्हणाले.

इव्हेंट चेअरमन रोटरीयन सत्यजित देशमुख यांनी देखील रोटरीच्या विविध उपक्रमांची माहिती सांगत जयवंत पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक जयवंत पाटील यांनी शाळेचा एकूण प्रवास कथन केला. यावेळी विविध संकटांवर मात करत संस्था कशी उभी राहिली?, हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले. दरम्यान हा पुरस्कार आपला नसून आपल्याला सहकार्य करणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकाचा आहे, असे सांगत त्यांनी आपल्या सहकारी शिक्षकांनाही विशेष धन्यवाद दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. एम. तिळवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रदीप देसाई यांनी केले तर आभार प्रदर्शन आर. जी. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक एस. एम. तिळवे, पी. एन. देसाई, श्रीमती आर. आर. पाटील, श्री. धुरी आदींनी सहकार्य केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles