सावंतवाडी : पुणे नॉलेज क्लस्टरच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत शासकीय आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांना एकवीसाव्या शतकातील आवश्यक कौशल्ये आणि तंत्रज्ञान साधने प्रदान करून प्रभावी STEM सक्षम बनवण्याचा उद्देशाने STEM-RewirED हा उपक्रम राबविला जात असून यासाठी राज्यातील पुणे, नाशिक आणि कोकण विभागातील निवडक उपक्रमशील शाळांचा समावेश आहे. नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांसाठी माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्लीची निवड झाली असून त्याअंतर्गत विद्यालयाचे राज्य शासन पुरस्कारप्राप्त विज्ञान शिक्षक पांडुरंग काकतकर यांना संधी प्राप्त झाली. प्रशिक्षण ऑनलाईन/ऑफलाईन अशा पाच भागात घेतले जाणार असून पहिल्या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना टॅबचे वाटप करण्यात आले.

STEM-रिवायर्ड हा गरज असलेल्या भागांतील शिक्षणात परिवर्तन घडवण्यासाठी डिझाइन केलेला उपक्रम आहे. या उपक्रमामार्फत डिजिटल दरी कमी करणे, विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल प्रज्वलित करणे आणि शिक्षणात परिणामकारकता निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे. या उपक्रमामध्ये दहापेक्षा अधिक प्रमुख शैक्षणिक संस्था आणि शैक्षणिक फाउंडेशनचा सहभाग आहे. त्यांच्या कौशल्यांचा वापर करून वैज्ञानिक पद्धतीने रचना (डिझाइन) व संयोजित केलेली STEM शिक्षण साधने जी दैनंदिन वर्गात थेट वापरता येतील तसेच अध्यापन व शिक्षण अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी मदत करतील.

आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, आगरकर रोड, पुणे येथे झालेल्या पहिल्या ऑफलाईन प्रशिक्षणात वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मंदार दातार यांनी ऑर्किडची विविधांगी रूपे आणि वनस्पतींच्या प्रजननातील विविध मनोरंजक क्लृप्त्या व संशोधन याबद्दल मार्गदर्शन केले,डॉ रितेशकुमार चौधरी, इटानगर, अरुणाचल प्रदेश यांनी प्लांटनेट, आयनॅचुरल अँपस, डॉ. के. पी. दिनेश यांनी व्हाइयेस ऑफ वेटलँड, बेडकांच्या विविध प्रजाती त्यांचे जैवविविधतेतील महत्व, प्रो.सरोज घासकबडी प्रयोगातून अभ्यासाचे महत्व, डॉ. कार्तिक बालसुब्रमन्यम डाएट, नदीचे प्रदूषण याबद्दल अँपस व प्रात्यक्षिकांच्या सहाय्याने माहिती दिली. प्रशिक्षणवर्गाचे प्रास्ताविक डॉ गायत्री क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रेयस खाडे, शीतल, कोमल, उत्कर्षा, सोनालिका, निहालिका, अथर्व यांचे विशेष सहकार्य मिळाले.


