हैद्राबाद : ‘घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी..”, आई.. कुठेही असली तरी आपल्या मुलांकडे तिचं लक्ष असतं, त्यांच्या भल्यासाठीच ती रात्रंदिवस झटत असते. आपल्या मुलांसाठी आई काहीही करू शकते. पण तीच आई आपल्या मुलांच्या जीवावर उठली तर? तेलंगणच्या महबुबाबादमध्ये असाच एक भयनक प्रकार घडला आहे. तेथील दोन मुलांच्या हत्याकांडाचे गूढ पोलिसांनी उलगडले आहे. पण तपासात जी माहिती समोर आली त्याने सगळेच हादरले. तपासात असे आढळले की त्या मुलांची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी केली नसून, त्यांच्या स्वतःच्या आईनेच केली आहे. आरोपी आईला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. त्या आईने आपल्या मुलांच्या हत्येची डायरी लिहिली होती, तिने तिच्या दोन्ही मुलांची निर्घृण हत्या केली आणि नंतर सर्वांना दिशाभूल करण्यासाठी त्यांच्या हत्येची खोटी कहाणी रचली. मात्र, एका छोट्याशा सुगाव्यामुळे पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे.
हे प्रकरण महबुबाबाद जिल्ह्यातील केसमुद्रम मंडलमधील नारायणपुरम गावातील आहे. सिरीशा आणि उपेंद्र हे तीन मुलांचे पालक होते. त्यांच्या सर्वात धाकट्या, दोन महिन्यांच्या नेहल नावाच्या बाळाचा 15 जानेवारी रोजी घराजवळील तलावात पडून मृत्यू झाला. त्या मुलाचा मृत्यू अपघाती आहे असंच सर्वांना वाटलं. मात्र, एका महिन्यापूर्वी, मोठा मुलगा मनीष कुमारवरही प्राणघातक हल्ला झाला. घरी आईच्या शेजारी झोपलेला असताना मनीषच्या मानेवर वार करण्यात आला.
मुलाला घेऊन रुग्णालयात आलेल्या आईने तक्रार केली की काही अज्ञात लोकांनी तिच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने तो या हल्ल्यातून वाचला. मात्र त्यानंतर काही दिवसांनी, 24 सप्टेंबरच्या रात्री त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.धाकट्या मुलाच्या मृत्यूनंतर आठ महिन्यांतच मोठा मुलगाही मरण पावला, ज्यामुळे कुटुंब आणि संपूर्ण गाव हादरून गेले. मनीषला कोणी मारले हे स्पष्ट न झाल्याने संपूर्ण गाव घाबरले होते. दोन मुलांना गमावल्यामुळे काळीज फाटून टाकणारा आक्रोश करणाऱ्या आईला पाहून सर्वांना तिची दया आली.
पोलिसांनी ‘अशी’ केली पोलखोल –
या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि त्यांनी तपास सुरू केला. पण त्यातून समोर आलेल्या सत्याने संपूर्ण गावाला धक्का बसला. पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की मुलांच्या मृत्यूमुळे खूप दुःखी असलेल्या त्यांच्या आईनेच दोन्ही मुलांची हत्या केली होती. तपासात असंही समोर आलं की सिरीशा हिलाही आत्महत्या करायची होती कारण तिचा नवरा मद्यपी होता.
त्या महिलेचा पती विवाहबाह्य संबंधांमुळे तिला त्रास देत होता. मरण्यापूर्वी तिला तिच्या तीन मुलांना संपवायचं होतं आणि नंतर आत्महत्या करायची होती. तिच्या डायरीत, तिने प्रथम तिन्ही मुलांना मारण्याची प्लान लिहीला. तिने आधीच दोघांना मारले होते आणि तिसऱ्या मुलालाही मारण्याची योजना आखत होती. पण त्याचदरम्यान पोलिसांनी सत्य उघड केले. अखेर पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून पुढील कारवाई करत आहेत.


