दुबई : आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामना उद्या रविवारी 28 सप्टेंबरला होणार आहे. या अंतिम फेरीत ए ग्रुपमधील दोन्ही संघांनी धडक दिली आहे. आशिया कप स्पर्धेच्या 41 वर्षांत पहिल्यांदाच भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महाअंतिम सामना होणार आहे. हा सामना दुबईत आयोजित करण्यात आला आहे. या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघांची महिन्याभरात आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ ठरणार आहे. भारताने याआधीच्या दोन्ही सामन्यात पाकिस्तानवर मात केली होती.
या अंतिम सामन्यानिमित्ताने दोघांपैकी टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने कोणत्या संघाने जिंकलेत? हे आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ –
आकडेवारी पाहता टी 20I क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं. उभय संघात आतापर्यंत एकूण 15 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 15 पैकी तब्बल 12 सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली आहे. तर पाकिस्तानला फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. तसेच टीम इंडियाने 14 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानवर साखळी फेरीत विजय मिळवला होता. भारताने त्यानंतर 21 सप्टेंबरला सुपर 4 फेरीत पुन्हा पाकिस्तानला लोळवलं होतं. भारताने साखळी फेरीतील सामना 7 तर सुपर फेरीत 6 विकेट्सने पाकिस्तानवर विजय मिळवला होता.
प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल निश्चित, कुणाला मिळणार संधी?
दरम्यान टीम इंडिया पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्यात असल्याचं निश्चित आहे. टीम इंडियात 2 बदल होणार असल्याचं पक्कं समजलं जात आहे. टीम इंडियाने सुपर 4 फेरीतील शेवटच्या सामन्यात अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा या दोघांचा समावेश केला होता. मात्र अंतिम सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ऑलराउंडर शिवम दुबे या दोघांचं एका सामन्याच्या विश्रांतीनंतर कमबॅक होणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.
सामना कधी आणि कुठे?
दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला भारतीय वेळेच्या हिशोबाने रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जोरदार सराव केला आहे. आता हा सामना कोणता संघ जिंकून आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.


