सावंतवाडी : सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव आणि मार्गदर्शक किरण ठाकूर यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेने नुकतेच आपल्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षात दिमाखात पदार्पण केले. या गौरवशाली निमित्ताने संस्थेवर आणि तिच्या शिस्तबद्ध कारभारावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यवस्थापिका संगीता प्रभू यांच्यासह सर्व कर्मचारी आणि निष्ठावान ठेवीदारांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग सहकारी उपनिबंधक बाळ परब यांच्या हस्ते झाले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकात रौप्य महोत्सवी वर्षात मिळवलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “हे यश केवळ माझे नव्हे, तर माझ्या कर्मचाऱ्यांसह सर्व सहकाऱ्यांचे आहे.” ‘मनी पॉवर’चा उपयोग गोरगरिबांना मदत करण्यासाठी व्हावा या उद्देशाने संस्थेचा पाया रचला गेला. अनंत उचगावकर यांनी सांगितले की, पहिल्या दिवसापासून इंग्लंडच्या धरतीवर संपूर्ण संगणकीय आणि वातानुकूलित संस्थेचे कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न सफल झाला. त्यांनी ठाम मत व्यक्त केले की, सहकारातील अडचणींचा मोह टाळल्यास कोकणातही सहकार वटवृक्ष होऊ शकतो. यावेळी त्यांनी संस्थेच्या आगामी मॉड्युलर नेत्र शस्त्रक्रिया व्हॅन प्रकल्पाची माहिती दिली आणि ग्रामीण भागातील जनतेने नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया करिता या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
सहकार उपनिबंधक बाळ परब यांनी संस्थेला भरभरून शुभेच्छा दिल्या. यशवंतराव भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत भोसले यांनी स्नेहनागरी संस्थेचा उल्लेख ‘शिस्तबद्ध संस्था’ असा केला. आपल्या शैक्षणिक संस्थेलाही पंचवीस वर्षे पूर्ण होत असताना, स्नेहनागरीची शिस्त आणि प्रामाणिकपणा पाहून आपण अधिक प्रभावित झालो, असे ते म्हणाले. रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी घाटावरच नव्हे, तर कोकणातही सहकार यशस्वी होतो, याचे उदाहरण स्नेहनागरी पतसंस्था आहे, असे सांगत शुभेच्छा दिल्या. निवृत्त बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी रवींद्र प्रभू देसाई यांनीही संस्थेच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांची उपस्थिती –
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अच्युत सावंतभोसले, संस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर, संचालक वैभव शेवडे, जिगजिनी मोतीराम मिसाळ, शिवकुमार उजगावकर, रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, सैनिक सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, संचालक जॉय डान्टस, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे सावंतवाडी शाखा अधिकारी लक्ष्मण आरोसकर, मृणालिनी कशाळीकर, माजी सभापती अशोक दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यबाहुल्यामुळे राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी हे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी संस्थेला शुभेच्छा संदेश पाठवले.
कार्यक्रमाची सुरुवात सौ. स्मिता केंकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या सुमधुर हिंदी आणि मराठी गाण्यांच्या कराओकेने झाली. सुमेधा नाईक धुरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


