कणकवली : खड्डे बुजवून रस्त्यांची डाग डुजी करावी जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत व्हावे यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या विनंती वजा आग्रहामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 23 कोटी 78 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली आणि सावंतवाडी कार्यकारी अभियंताना खड्डे बुजवण्यासाठी व रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी परिपूर्ण अहवाल देण्याचे सूचना केल्या होत्या. त्या अहवालानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडून 23 कोटी 78 लाख रुपये इतका निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कडील रस्त्यां वरील खड्डे भरण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूर करून घेतला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पंधरा मे पासून पाऊस सुरू झाला. साडेचार महिने सातत्याने पाऊस पडत आहे अजूनही एक महिना पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे रस्त्यांची नादुरुस्ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अनेक रस्त्यावर खड्डे झालेले आहेत हे खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी यापूर्वीच्या बैठकीत सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचे अहवाल देण्याच्या आदेश दिले होते त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकामच्या 88 रस्त्यांसाठी हा निधी प्राप्त झालेला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावामुळे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भरघोस असा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेला असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला खड्डे मुक्त होईल असा विश्वास निर्माण झाला आहे.


