अहमदाबाद : टीम इंडियाचा अनुभवी आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेत अप्रतिम सुरुवात केली आहे. केएलने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी अप्रतिम शतक ठोकलं आहे. केएलने शिट्टी वाजवत शतक साजरं केलं. केएलने यासह मायदेशात तब्बल 9 वर्षांची प्रतिक्षा संपवली. तसेच केएलने या शतकासह भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज रवी शास्त्री आणि मोहिंदर अमरनाथ यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
केएलचं मायदेशात 9 वर्षांनंतर कसोटी शतक –
रोस्टन चेज याने भारतीय डावातील 65 व्या ओव्हरमधील टाकलेल्या पाचव्या बॉलवर केएलने 1 धाव घेतली. केएलने यासह शतक पूर्ण केलं. केएलला शतकापर्यंत पोहचण्यासाठी 190 चेंडूचां सामना केला. केएलने या शतकी खेळीत 12 चौकार ठोकले. केएलचं हे कसोटी कारकीर्दीतील 11 वं तर मायदेशातील नववं शतक ठरलं. केएलने मायदेशात जवळपास 9 वर्षांनंतर 3 हजार 211 व्या दिवशी शतक ठोकलं आणि प्रतिक्षा संपवली. केएलने मायदेशातील पहिलंवहिलं शतक हे 2016 साली केलं होतं.
शास्त्री-अमरनाथ यांच्या विक्रमाची बरोबरी –
केएलने या शतकासह भारतीय माजी फलंदाज रवी शास्त्री आणि मोहिंदर अमरनाथ या दोघांच्या 11 कसोटी शतकांची बरोबरी केली. या दोन्ही माजी दिग्गजांनी त्यांच्या कसोटी कारकीर्दीत 11 वेळा शतकी खेळी साकारली होती.
केएलच्या शतकाचं वैशिष्ट्य –
केएलचं 2025 या वर्षात ओपनर म्हणून तिसरं शतक ठरलं. तसेच केएल या वर्षात सर्वाधिक शतक करणारा एकूण दुसरा फलंदाज ठरला आहे. तसेच केएलचं हे विंडीज विरुद्धचं दुसरं कसोटी शतक ठरलं. तसेच केएल भारतासाठी सर्वाधिक कसोटी शतक करणारा पहिला सक्रीय फलंदाजही आहे.
टीम इंडिया मजबूत स्थितीत –
दरम्यान या कसोटीत टीम इंडिया आतापर्यंत मजबूत स्थितीत आहे. भारताने विंडीजला पहिल्या डावात 164 धावांवर रोखलं. त्यानंतर भारताने दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत 3 विकेट्स गमावून 67 ओव्हरमध्ये 218 रन्स केल्या आहेत. केएल 100 आणि ध्रुव जुरेल 14 रन्सवर नॉट आऊट आहेत. त्याआधी कॅप्टन शुबमन गिल 100 चेंडूत 50 धावा करुन बाद झाला. तर यशस्वी जैस्वाल याने 36 आणि साई सुदर्शन याने 7 धावा केल्या.
केएलची कसोटीत धावांबाबत सर्वोत्तम वर्षं –
दरम्यान केएलसाठी 2025 हे आतापर्यंत कसोटी क्रिकेटमधील धावांबाबत सर्वोत्तम वर्ष ठरलं आहे. केएलने शतकासह या वर्षात 649 धावा केल्या आहेत.
2025 – 649 धावा 2024 – 493 धावा 2017 – 633 धावा 2016 – 539 धावा.


