दोडामार्ग : सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथे दोन दिवसांपूर्वी पट्टेरी वाघाने आपले दर्शन दिले होते. ही घटना ताजी असतानाच आज दोडामार्ग तालुक्यातील केर येथे चक्क भर रस्त्यावर वाघाने आपली हजेरी लावली. विशेष म्हणजे तेथील ग्रामस्थ ओंकार देसाई यांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
तब्बल १५ हून अधिक मिनिटे तो वाघ रस्त्यातच बसून होता. त्यामुळे सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात वाघाचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
ही घटना आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास केर येथे घडली. तत्पूर्वी वाघाने गावातील मंगेश देसाई यांच्या गाईवर हल्ला केल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, सविस्तर माहिती अशी की, केर येथे राहणारे ओंकार देसाई हे आपल्या ताब्यात असलेल्या कारमधून घरी जात होते. यावेळी त्यांना रस्त्यावर वाघ बसलेला दिसला. ते कारमध्ये असल्यामुळे त्यांनी आपल्या हातातील मोबाईलच्या कॅमेरामध्ये या वाघाची छबी कैद केली. दरम्यान गेले काही दिवस वाघ सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने योग्य ती कार्यवाही करावी आणि कोणतीही अनुचितघटना घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
मात्र वाघाचे चक्क भर रस्त्यात दर्शन होत असल्यामुळे दुचाकीस्वार आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच ज्या गावात वाघ फिरत आहे. त्या ठिकाणीही ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट आहे.


