सावंतवाडी : आधुनिक तंत्रज्ञानामध्ये फार मोठी क्रांती झालेली आहे. ज्यामुळे आपले दैनंदिन जीवन सुसय्य झालेले आहे. आता तर ए.आय मुळे या क्षेत्रात झालेला बदल विलक्षण आहे. एका सेकंदात एका कवर जगाच्या कुठच्याही कोपऱ्यात संवाद साधता येतो. तसेच आपल्या हवी असलेली कोणत्याही प्रकारची माहिती मिळवता येते, असे जरी असले तरी आजच्या परिस्थितीत मोबाईलचा अती वापरामुळे अनेक सामाजिक व मानसिक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. मोबाईलचा दुरोपयोग होत असल्यामुळे सायबर क्राईमचे प्रमाणही विलक्षण वाढलेले आहे. ताणतणाव, विसंवाद, कौटुंबिक कलह, संशय यामुळे घटस्फोटाचे प्रमाणही वाढलेले आहे. मोबाईलमुळे कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांची भर पडत आहे. अशावेळी सर्वानीच मोबाईलचा वापर करताना आणि समाजमाध्यमांद्वारे व्यक्त होताना काळजी घेतली पाहिजे असे आवाहन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर यांनी केले. नेमळे हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजमध्ये ‘मोबाईलचे दुष्परिणाम व समाजमांध्यमांचा वापर’ या विषयावर अटल प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.

(फोटो – जनजागृती कार्यक्रमात संबोधित करताना अॅड. नकुल पार्सेकर. सोबत मुख्याध्यापिका सौ. कल्पना बोवलेकर, सौ. मानसी परब, श्री. रमाकांत प्रभू तेंडोलकर, व श्रीमती. अर्पिता वाटवे.)
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अटल प्रतिष्ठान संचलित महिला समुपदेश केंद्र सावंतवाडीच्या समुपदेशक श्रीमती. अर्पिता वाटवे यांनी मोबाईलमुळे गुन्हाचे प्रमाण वाढलेल असून शालेय मुलसुध्दा मोबाईलच्या आहारी जावून सायबर गुन्हयामध्ये अडकत आहेत. ज्या वयात मुलाने आपल्या करिअरकडे लक्ष द्यायला पाहिजे अशावेळी मोबाईलमुळे त्यांची दिशा भरकटत असून अजाणतेपणे जरी समाज माध्यमांद्वारे एखाद्या मुलाकडून गुन्हा घडला त्यालासुध्दा आता सुधारित कायद्यानुसार शिक्षा होऊन अशा मुलांची रवानगी बालगृहात केली जाते. अशावेळी अशा मुलांच्या पालकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे आणि संभाव्य परिणाम टाळले पाहिजे, असे आवाहन श्रीम. वाटवे यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेच्या मुख्याधापिका सौ. कल्पना बोवलेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून अशा प्रकारचे शाळाशाळामधून जनजागृतीचे कार्यक्रम अटल प्रतिष्ठान सारखी सामाजिक संस्था करत आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाला नेमळे पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमाकांत प्रभू तेंडोलकर, सौ. मानसी परब (सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला जिल्हाध्यक्षा इंटरनॅशनल ह्युमन राईट वेलफेअर असोशिएशन), अटल प्रतिष्ठानच्या कार्यालयीन प्रमुख कु. ज्योती राऊळ, शाळेतील सहकारी शिक्षक, व्यवस्थापक मंडळाचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहकारी शिक्षक अनिल कांबळे यांनी केले.


