सावंतवाडी : संपूर्ण राज्यात सद्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू असून सेवा पंधरवडा राबवला जात आहे. यालाच अनुसरून स्वच्छता,आरोग्य,महिला सक्षमीकरण अशा विविध घटकांना आवश्यक असे उपक्रम राबवले जातात. आता ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत ‘घर तेथे शोषखड्डा अभियान’ शासनाकडून सुरू करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. सावंतवाडी तालुक्याची सुरुवात मळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मळेवाड माळकरटेंब येथील अनिल नाईक यांच्या घराशेजारील परसबागेत शोषखड्डा खोदाई सुरू करून या अभियानाचा प्रारंभ सावंतवाडी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. हे अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरेने पुढाकार घेतला आहे.
या शुभारंभप्रसंगी सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, मधुकर जाधव, रोजगार सेवक अमित नाईक, ग्रामपंचायत अधिकारी भालचंद्र सावंत, वैभव मोरुडकर, अंगणवाडी सेविका, सीआरपी, ग्रामस्थ, कर्मचारी आदी उपस्थित होते.


