नाशिक : ऑनलाइन रमी खेळल्याचा आरोप झाल्यानंतर चर्चेत आलेले राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याची आज (६ ऑक्टोबर) नाशिक न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात कोकाटे यांनी स्वतः न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडली.
काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेच्या सत्रात मंत्री कोकाटे मोबाइलवर ‘जंगली रम्मी’ खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या आधारे आमदार रोहित पवार यांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. कोकाटे यांनी मात्र हा आरोप फेटाळत “मी रमी खेळत नव्हतो, मला रमी खेळताच येत नाही” अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. यानंतर कोकाटे यांनी रोहित पवार यांना कायदेशीर नोटीस पाठवत स्पष्टीकरण मागवले. मात्र, उत्तर न आल्याने त्यांनी नाशिक न्यायालयात थेट अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
कोर्टात मांडलेला मंत्री कोकाटेंचा जबाब काय?
– “माझ्या मोबाईलवर ‘जंगली रमी’ ची जाहिरात आली होती, ती बंद करताना 15 ते 20 मिनिटे लागली. त्याच दरम्यानचा व्हिडिओ काढून आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर अपलोड केला.”
– “मी विधान परिषदेमध्ये स्पष्ट स्पष्टीकरण दिले. त्यानंतरही रोहित पवार यांनी ट्विट करत बदनामी केली.”
– “या प्रकारामुळे मला कृषी खात्याचा मंत्रिपद गमवावे लागले, पक्ष आणि वैयक्तिक प्रतिमेला मोठा धक्का बसला.”
– “व्हिडिओ कोणी आणि कसा काढला, याची चौकशी व्हावी. कारण, रोहित पवार हे विधान परिषद सदस्य नाहीत, तरीही त्यांच्याकडे व्हिडिओ कसा पोहोचला, हे महत्त्वाचे आहे.” असा युक्तिवाद माणिकराव कोकाटे यांच्याकडून करण्यात आला.
कोकाटेंचे वकील डॉ. मनोज पिंगळेंची प्रतिक्रिया –
“या व्हिडिओच्या निर्मितीमागे कोणते तंत्रज्ञान वापरले गेले, की तो खरा आहे की नाही, याबाबत न्यायालयीन चौकशी आवश्यक आहे.” या प्रकरणातील संपूर्ण सत्य चौकशीनंतर बाहेर येईल, असा आमचा विश्वास आहे,” अशी प्रतिक्रिया कोकाटेंचे वकील डॉ. मनोज पिंगळे यांनी दिली आहे.
पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी –
या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या प्रकरणात एकीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आक्रमक पवित्र्यात राहिले, तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावून आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.आता पुढील सुनावणीत काय घडते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


