कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीत सरपंचांच्या मनमानी कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक झाले असून, आता ते रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
डोंगरवाडी आणि जोळकवाडी या भागातील नागरिक आजही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. संध्याकाळ होताच गावकऱ्यांना काळोखातून प्रवास करावा लागतो. स्ट्रिट लाईट नाहीत, रस्त्यांची अवस्था बिकट आहे, आणि जंगली प्राण्यांच्या भीतीतून ग्रामस्थ रोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.आणि गावात ज्या ठिकाणी रहदारीच्या ठिकाणी आधीची स्ट्रिट लाईट आहे त्या बाजुला सौर ऊर्जा पथदिवे लावण्यात आले.

या समस्यांबाबत ग्रामस्थांनी सरपंचांकडे विचारणा केली. स्थानिक पत्रकाराने देखील या विषयावर विचारणा केली. मात्र, समस्या सोडवण्याऐवजी सरपंचांनीच पोलिसांत अर्ज दाखल करून संबंधित पत्रकार आणि ग्रामस्थांवर ३५३ कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. गावात स्ट्रिट लाईट नाहीत, स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ते नाहीत, तर ग्रामपंचायतीला मिळालेली कचरा गाडी धुळखात पडली आहे. तळीवाडी येथील पारधी कुटुंब आजही गुडघ्याभर चिखलातून प्रवास करत आहे.
पत्रकार आणि ग्रामस्थांवर कारवाईची धमकी देणाऱ्या सरपंचांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


