मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. त्यामुळे आता मुंबईला दुसरं विमानतळ मिळाले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि नेते उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौथ्या मुंबईची घोषणा केली आहे.
चौथी मुंबई कुठे असेल?
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले की, ‘हा एअरपोर्ट इंजिनिअरिंग मार्बल आहे. यासाठी डोंगर तोडावा लागला, नदीचा प्रवाह बदलावा लागला. त्यातून सुंदर एअरपोर्ट सुरू झाला. हा भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा एक एअरपोर्ट आहे, त्यातून एक टक्का महाराष्ट्राचा जीडीपी वाढणार आहे. वॉटर टॅक्सी इथे असेल. त्यातून गेटवेला जाता येणार आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौथ्या मुंबई विषयी भाष्य केले आहे. याबाबत फडणवीस म्हणाले की, ‘नवी मुंबई एअरपोर्ट जवळ तिसरी आणि वाढवणजवळ चौथी मुंबई होणार आहे. मोदीजी तुम्ही महाराष्ट्राच्या पाठी पहाडासारखे उभे राहता. त्यामुळे महाराष्ट्र पुढे जात आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही.’ त्यामुळे आगामी काळात या भागात तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईची उभारणी होणार आहे.
नवी मुंबई विमानतळासाठी 19,650 कोटी रुपयांचा खर्च –
नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सुमारे 19650 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आला आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वर्षाला 90 दशलक्ष प्रवासी हाताळू शणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. या विमानतळामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे.
मेट्रो-3 पूर्णपणे प्रवाशांच्या सेवेत –
मुंबई मेट्रो लाईन-3 चा अंतिम टप्पा आजपासून मुंबईकरांसाठी खुला झाला आहे. हा टप्पा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड असा आहे. यामुळे गोरेगाव आरे ते कफ परेड असा संपूर्ण प्रवास मुंबईकरांना थेट करता येणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर ठरणार आहे.


