मुंबई : महाराष्ट्रातील सावंतवाडी संस्थानाच्या गौरवशाली कला-परंपरेचा आज देशभरात पुन्हा एकदा सन्मान झाला. संस्थानकालीन अद्वितीय ‘गंजिफा’ कला आणि कोकणातील दशावतार कलेला भारतीय टपाल विभागाने विशेष पोस्ट तिकिटावर स्थान देऊन नवा उंची गाठली आहे. विशेष म्हणजे, देशाच्या इतिहासात प्रथमच चौकोनी नसून गोलाकार स्वरूपातील पोस्ट कार्ड या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आले आहे.या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मुंबई येथे आयोजित सोहळ्याला सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, राणी शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले आणि युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले उपस्थित होते.

या गौरवामुळे सावंतवाडीची कला-संस्कृती आता सातासमुद्रापार पोहोचणार आहे. आता या गंजिफा पोस्ट कार्डच्या माध्यमातून सावंतवाडीची कला देशोदेशी पोहोचणार आहे. ही सावंतवाडीसाठी अभिमानास्पद बाब आहे. या पोस्टकार्डवर दशावतार गंजिफा कलेचे सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे. दशावतार ही कोकणातील जीवनशैलीचा अविभाज्य भाग असलेली पारंपरिक लोककला आहे. या उपक्रमामुळे सावंतवाडीच्या समृद्ध लोककलांना एक मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे. एकेकाळी केवळ राजघराण्यांच्या दरबारात खेळला जाणारी ‘गंजिफा’ कला आता भारताच्या तिकिटावर झळकत आहे. सावंतवाडीच्या कला-संस्कृतीचा, परंपरेचा आणि स्थानिक कलाकारांच्या मेहनतीचा हा गौरव आहे. सावंतवाडी संस्थानाच्या परंपरेला आणि कला-वारसाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा मोठा सन्मान केवळ सिंधुदुर्ग आणि कोकणासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या कला-इतिहासासाठी एक सुवर्णाक्षरी क्षण ठरला आहे.


