सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गावातील गावठण वाडी व झेंगाट वाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोवा बनावटी अवैध दारू जप्त केली आहे. या कारवाईत दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
पहिली कारवाई वेर्ले गावठण वाडी येथे करण्यात आली. येथील शिवराम कृष्णा राऊळ यांच्या घरावर छापा टाकून अधिकाऱ्यांनी एकूण 15 ब.ली. गोवा बनावटी दारू व 4 ब.ली. किन्वित बिअर असा एकूण ₹22,250/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा र.नं. 209/2025 असा नोंद करण्यात आला आहे.दुसरी कारवाई वेर्ले झेंगाट वाडी येथे राजेंद्र तुकाराम राऊळ यांच्या घरावर करण्यात आली.
या ठिकाणावरून 10.80 ब.ली. गोवा बनावटी दारू व 4.5 ब.ली. किन्वित बिअर असा एकूण ₹10,860/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा र.नं. 210/2025 असा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही कारवाया राज्य उत्पादन शुल्क कुडाळ विभागाचे निरीक्षक मिलिंद शिवाजीराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या स्टाफने केल्या. आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असून, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे सीमावर्ती भागात चालणाऱ्या अवैध दारू व्यवसायावर आळा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


