भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी करुन क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. भारतीय महिला संघाने या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे भारतीय संघाला आपल्या मोहिमेतील तिसऱ्या सामन्यात विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आपल्या मोहिमेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे भारताकडे दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिका भारतीय संघाची विजयी घोडदौड रोखणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
भारताने स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात 30 सप्टेंबरला श्रीलंकेला पराभूत करत विजयी सलामी दिली. भारताने श्रीलंकेवर डीएलएसनुसार 59 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर 5 ऑक्टोबरला भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. महिला ब्रिगेडने पाकिस्तानला 88 रन्सने लोळवलं. भारताने अशाप्रकारे सलग 2 सामने जिंकले. आता भारताच्या निशाण्यावर दक्षिण आफ्रिका आहे.
दक्षिण आफ्रिकेची कामगिरी –
दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं. तर दक्षिण आफ्रिकेने 6 ऑक्टोबरला आपल्या दुसऱ्या सामन्यात विजयाचं खातं उघडलं होतं. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडवर 6 विकेट्सने मात केली होती. एकूण आकडे पाहता भारताची विजयी टक्केवारी ही 100 आहे. तर दक्षिण आफ्रिकेने 2 पैकी 1 सामना गमावला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी टीम इंडिया आव्हानात्मक ठरणार हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र त्यानंतरही हा खेळ आहे. कधी कोण जिंकेल? सांगता येत नाही. त्यामुळे या सामन्यात कोण मैदान गाजवणार? हे पाहण्यासाठी आणखी काही तासांची प्रतिक्षा चाहत्यांना करावी लागणार आहे.
पॉइंट्स टेबलमध्ये चढाओढ –
दरम्यान दुसऱ्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 4 साठी आणखी चुरस पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा राउंड रॉबिन फॉर्मेटने होत आहे. तसेच या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाला इतर 7 संघांविरुद्ध प्रत्येकी 1-1 असे एकूण 7 सामने खेळायचे आहेत. त्यानुसार पॉइंट्स टेबलमधील अव्वल 4 संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहेत. त्यामुळे टॉप 4 मध्ये राहण्याचा संघांचा प्रयत्न आहे. स्पर्धेतील नवव्या सामन्यानंतर भारतीय संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावर आहे.


