नागपपूर : चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. निर्माता, दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटातील तथा बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या अभिनेत्याची हत्या झाली आहे. या अभिनेत्याचे नाव प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री असून त्याची नागपूरमध्ये हत्या करण्यात आली आहे.एका कुख्यात गुन्हेगाराने किरकोळ वादातून त्याच्याच साथीदाराची निर्घृणपणे चाकूने वार करून हत्या केल्याचं म्हटलं जात आहे. अतिशय निर्दयीपणे त्याची हत्या करण्यात आली आहे. प्रियांशुचे दोन्ही हातपाय वायरने बांधून त्याची हत्या करण्यात आली. अर्धनग्न आणि अतिशय गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांना प्रियांशु आढळला होता. तेव्हा पोलिसांनी त्याला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, शस्त्राचे अनेक ठिकाणी भीषण घाव, मोठा रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचे उघड –
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. घटनेच्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी ध्रुव लाल बहादूर साहू याला अटक केली.पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.तसेच या हत्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा संशयित ध्रुवकुमार लालबहादूर साहू हा उत्तर नागपुरातील नारा परिसरात राहतो.

दोघांवरही चोरी, मारहाण असे गुन्हे दाखल आहेत –
दुसरीकडे मेकोसाबाग परिसरात राहणारा बाबू छत्री म्हणजेच प्रियांशु याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. दोघांवरही चोरी, मारहाण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. या दोघांचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि ध्रुवकुमारने दारूच्या नशेत छत्रीच्या हातापायभोवती वायर गुंडाळून त्याची सपासप शस्त्राचे घाव घालत हत्या केल्याचे बोलले जाते. जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी आले आणि नंतर त्यांनी पोलिसांना बोलावले. त्याला रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
‘झुंड’मुळे सर्वदूर लोकप्रिय ठरला –
दरम्यान ‘झुंड’ चित्रपटात बाबू छत्रीच्या अफलातून भूमिकेने तो सर्वदूर लोकप्रिय ठरला होता. मात्र या घटनेमुळे नक्कीच सर्वांना धक्का बसला आहे.तसेच या घटनेने परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


