विशाखापट्टणम : टीम इंडियाने आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील दहाव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 252 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 251 रन्स केल्या. टीम इंडियाची या सामन्यात चांगली सुरुवात झाली. मात्र त्यानंतर टॉप ऑर्डरमधील तिन्ही फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. तर मिडल ऑर्डरने घोर निराशा केली. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली होती. मात्र विकेटकीपर बॅट्समन रिचा घोष हीने अमनजोत कौर आणि स्नेह राणा यांच्यासह सातव्या आणि आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारताला 250 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे आता भारतीय गोलंदाज या 251 धावांचा यशस्वी बचाव करत विजयी हॅटट्रिक पूर्ण करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाची बॅटिंग –
प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने 55 धावांची भागीदारी केली. भारताने स्मृतीच्या रुपात पहिली विकेट गमावली. स्मृती सलग तिसऱ्या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. स्मृतीने 23 धावा केल्या. स्मृतीनंतर दक्षिण आफ्रिकेने भारताला 83 धावांवर दुसरा झटका दिला. इथून टीम इंडियाची घसरगुंडी झाली. हर्लीन देओल 13 धावांवर बाद झाली. प्रतिका रावल हीने 37 धावा केल्या. जेमीमाह रॉड्रिग्सची 3 सामन्यांत झिरोवर आऊट होण्याची दुसरी वेळ ठरली. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने 9 धावा केल्या. दीप्ती शर्माकडून आशा होत्या. मात्र ती 4 धावा करुन आऊट झाली. भारताची अशाप्रकारे 83-1 वरुन 102-6 अशी नाजूक स्थिती झाली. दीप्ती आऊट झाल्यानतंर रिचा घोष आठव्या स्थानी आली. रिचा आणि अमनज्योत या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघींनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दोघींनी 52 रन्स जोडल्या. त्यानंतर अमनजोत 44 चेंडूत 13 रन्स करुन मैदानाबाहेर गेली. त्यामुळे भारताचा स्कोअर 40 ओव्हरनंतर 7 आऊट 153 असा झाला.
आठव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी –
अमनजोतनंतर स्नेह राणा मैदानात आली. स्नेह आणि रिचा या जोडीने कमाल केली. या दोघींनी केलेल्या भागीदारीमुळे भारताला खऱ्या अर्थाने 250 पोहचता आलं. या दोघींनी आठव्या विकेटसाठी 88 रन्सची पार्टनरशीप केली. स्नेह राणा आऊट होताच ही जोडी फुटली. स्नेहने 24 बॉलमध्ये 6 फोरसह 33 रन्स केल्या.
रिचा घोषची झुंजार खेळी –
स्नेह आऊट झाल्यानंतर रिचाने काही मोठे फटके मारुन शतक करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरली. रिचाचं अर्धशतक अवघ्या 6 धावांनी हुकलं. रिचाने 77 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 11 फोरसह 84 रन्स केल्या. रिचानंतर श्री चरणी पहिल्याच बॉलवर आऊट झाली. भारताचा डाव अशाप्रकारे 1 बॉलआधी 251 रन्सवर आटोपला. भारताने शेवटच्या 10 ओव्हरमध्ये 98 रन्स केल्या.


